भिवंडी / इताडे : इताडे गावात आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घरफोडीची गंभीर घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घरातील पुरुष मंडळी कामावर गेल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश केला. यावेळी घरात एकटी असलेल्या महिलेवर हल्ला करून रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने घेऊन आरोपी पसार झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे पती आणि दोन मुले नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. दुपारी महिला घरात एकटी असताना जेवण करत होत्या. त्याचवेळी अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश करून त्यांच्यावर अचानक हल्ला केला. मुलांच्या लग्नासाठी साठवून ठेवलेले दागिने आणि घरातील रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन आरोपी फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या हल्ल्यात महिलेला गंभीर दुखापत झाली असून स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी आयुष हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे इताडे गाव आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
सावधान इताडे! गावाच्या सुरक्षेसाठी एकत्र येणे काळाची गरज
दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे गावाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गावातील नागरिकांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून सुरक्षेसाठी एकत्र येणे आवश्यक आहे.
गावातील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, अनोळखी व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देणे, महत्त्वाच्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवणे तसेच रात्रीच्या गस्तीचे नियोजन करणे गरजेचे आहे.
आपले गाव आणि आपली माणसे सुरक्षित ठेवायची असतील, तर एकमेकांना साथ देऊन सतर्क राहणे हीच काळाची गरज आहे.

























