भिवंडी (विशेष प्रतिनिधी): तालुक्यातील इताडे गावात सध्या लग्नसराईची जोरदार धामधूम सुरू असताना निसर्गाच्या बदलत्या रूपामुळे मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते, त्यामुळे वातावरणात आलेल्या गारव्याने दिलासा मिळाला खरा, मात्र सोसाट्याच्या वाऱ्याने लग्नाच्या आनंदावर विरजण घातले आहे.
लग्नामंडपांचे मोठे नुकसान मिळालेल्या माहितीनुसार, हवेचा वेग प्रचंड असल्याने इताडे गावात उभारण्यात आलेले लग्नमंडप आणि सजावटीचे साहित्य विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी मंडपाचे कापड फाटले असून, बांबू निखळल्यामुळे मंडप कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे मंडप व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे चित्र दिसत आहे.
वऱ्हाडींची उडाली धावपळ हळदीच्या कार्यक्रमात पाहुणे आणि वऱ्हाडी मंडळी मग्न असतानाच पावसाने अचानक हजेरी लावल्याने सर्वांची तारांबळ उडाली. पावसामुळे जेवणाची सोय आणि इतर व्यवस्थांवर परिणाम झाला आहे. एकीकडे उन्हाच्या तडाख्यातून सुटका झाल्याचा आनंद असला, तरी दुसरीकडे लग्नकार्यात पाऊस आणि वाऱ्याने निर्माण केलेल्या अडथळ्यामुळे यजमान मंडळी काळजीत पडली आहेत. ‘कोणाचेही नुकसान न होता हे सोहळे निर्विघ्न पार पडावेत’ अशी प्रार्थना आता ग्रामस्थ करत आहेत.
वृत्तांकन: प्रतिनिधी गितेश नरेश पाटील, इताडे (भिवंडी)

✍🏻मुख्य संपादक – सौ.स्नेहा गितेश पाटील












