भिवंडी तालुक्यातील वडघर, खारबाव आणि कोनगाव या गावांमध्ये सध्या ग्रामदैवतांच्या वार्षिक उत्सवामुळे भक्तीचे वातावरण ओसंडून वाहत आहे. श्री कालिकामाता यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य पालखी सोहळ्यात ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे महिला भाविकांचा उदंड प्रतिसाद; त्यांनी पारंपरिक वेशभूषेत आणि दागिन्यांनी नटून आई कालिकामातेची पालखी आपल्या खांद्यावर घेत या भक्तीमय सोहळ्याची शोभा वाढवली. संपूर्ण उत्सवादरम्यान टाळ-मृदंगाच्या गजरात होणारी भजने, सामुदायिक हरिपाठ आणि प्रबोधनात्मक कीर्तन सोहळ्यांमुळे गावागावात अध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले आहे. नित्यम न्यूजचे संपादक जितेश पाटील आणि विशेष प्रतिनिधी माही भारत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व धार्मिक घडामोडींचे विशेष वृत्तांत प्रसारित करण्यात येत असून, स्थानिक संस्कृतीला व्यासपीठ देण्याचे काम अविरत सुरू आहे.

✍🏻मुख्य संपादक – सौ.स्नेहा गितेश पाटील












